न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून मार्ग काढावा : संजय राऊत

sanjay raut
बेळगाव (वृत्तसंस्था) बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

या संदर्भातील चर्चेसाठी येदीयुरप्पा यांनी मुंबईत यावे किंवा उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकात यावे. याला चर्चेत शरद पवार यांची उपस्थिती महत्वाची आहे. बेळगावप्रश्नी शरद पवार हे या आंदोलनाचे बिनीचे शिलेदार होते. काठ्या खाल्ल्या आहेत. छगन भुजबळ, एकनाथ शिंदे हे या आंदोलनात होते. दोन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात शिखर परिषद होणे गरजेचे आहेत. या सर्वात पवारांची भुमिका महत्वाची असणार आहे. इथल्या मराठी बांधवांचे तातडीचे प्रश्न सुटण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या जो निकाल लागेल तो लागेल. मात्र सध्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन या विषयावर चर्चा झाली पाहिजे. न्यायालयाचा जो निकाल लागेल त्याच्यात किती पिढ्या अजून जातील ते सांगता येत नाही. मी सतत सांगेन की, दोन मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात चर्चा करुन मार्ग काढावा. या देशामध्ये लोकशाही आहे. शेवटी चर्चेतून विषय सूटावा. या भागात राहणारे मराठी भाषिक देशाचेच नागरिक आहेत. या क्षणी ते कर्नाटक राज्याचे नागरिक आहेत. त्यांची देखभाल करणे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे.

Protected Content