राष्ट्रीय आरोग्य मिशनची भरती रखडली, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण!


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवेची पुरती वाताहत झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक आणि तंत्रज्ञ यांसारख्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर होत असून, रुग्णांना वेळेवर आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अभियानांतर्गत होणारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया देखील गेल्या वर्षभरापासून रखडलेली आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची फाईल मंजुरीसाठी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे पडून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊ शकलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात शहरी भागातील नागरिकांसाठी १५ ग्रामीण रुग्णालये, तर ग्रामीण भागातील लोकांसाठी ७८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवली जाते. मात्र, या आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनेक पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. त्यामुळे जे काही कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्यावर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा भार येऊन पडला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची फाईल मंजुरीसाठी सीईओंच्या टेबलावर प्रलंबित असल्याने, जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप या भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नाही. यामुळे आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची मोठी वाणवा निर्माण झाली आहे.

आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे तिची अक्षरशः वाताहत झाली आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेवर योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन अभियानांतर्गत रिक्त असलेल्या जागांवर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.