


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने ३० जून रोजी मुंबई येथे विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी अमळनेर शहर व ग्रामीण भागातील चर्मकार समाज बांधवांची पूर्वनियोजित बैठक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पार पडली. बैठकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
शासनाकडून अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला जात असल्याने समाजावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा आरोप राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. समाजातील घटकांशी कोणतीही चर्चा न करता उपवर्गीकरणाचा निर्णय लादला जात असल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील अनुसूचित जाती समाज मुंबई येथे एकत्र येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची मागणी समाजातील कोणत्याही घटकाने केलेली नसताना शासनाकडून हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निर्णयामुळे समाजामध्ये विभाजन निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या विराट मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग विसावे, नगरसेविका अंजली विसावे यांच्यासह अमळनेर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. बैठकीत ३० जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
अनुसूचित जाती समाजाच्या हक्क व न्यायासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या मोर्चात महाराष्ट्रातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भानुदास विसावे व पांडुरंग विसावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिऱ्हाडे यांनी केले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघ आक्रमक झाला असून, समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० जूनचा मुंबईतील मोर्चा निर्णायक ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



