साध्वीच्या उमेदवारीचे मोदींकडून समर्थन

नवी दिल्ली वृत्तसंस्था । साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्यावरून सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होत असतांनाच आता पंतप्रधान मोदी यांनी त्यांची पाठराखण केली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी त्यांचे समर्थन केले.

या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हजारो वर्षांपासून जो देश एका महान संस्कृतीचा पाइक आहे. ज्या देशाने विविधता आणि अखंडता जपली आहे. अशा संस्कृतीला कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय काँग्रेसने एका क्षणात दहशतवादाचे लेबल लावले. दहशतवादी म्हणून हिणवले. त्याला उत्तर देण्यासाठीच आम्ही भोपाळमधून हा चेहरा दिला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शीख समुदायातील लोकांना कशा प्रकारे लक्ष्य करण्यात आले, याचे अनेक पुरावे आहेत. ज्यांच्यावर आरोप होते ते काँग्रेसजन नंतर आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे तर याचे ताजे उदाहरण आहे. न्यायालयाने ज्यांना शिक्षा सुनावली आहे, त्यांनाच काँग्रेसवाले जाऊन कारागृहात भेटत आहेत; त्यांच्या भेटी घेत आहेत; रुग्णालयात जाऊन भेट घेत आहेत; अशा माणसांना तत्त्व आणि सिद्धांताच्या गोष्टी करण्याचा कोणताही हक्क नाही, असे टिकास्त्र मोदींनी सोडले. साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीला विरोध केल्यास काँग्रेसला ते महाग पडणार असल्याचा इशारासुध्दा पंतप्रधानांनी दिला.

Add Comment

Protected Content