सिंधूदुर्ग प्रतिनिधी | सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वर्चस्व मिळवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का दिला आहे. विशेष करून शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून देखील यात राणेंना यश आल्याने ते पुढील काळात अजून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. १९ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सुशांत नाईक यांनी पराभव केला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.
दरम्यान, नारायण राणे यांच्याकडे दोन पंचवार्षिक पासूनच जिल्हा बँकेची सूत्रे आहेत. मात्र विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राणे यांना धक्का बसला होता. तर आता सावंत यांना पराभूत करून राणेंनी याची परतफेड केली आहे. राणेंच्या या विजयाचा मविआला धक्का बसला आहे. मात्र खरा हादरा हा शिवसेनेला बसल्याचे मानले जात आहे.