डॉ. जयप्रकाश रामानंद यांची अधिष्ठातापदी पुन्हा नियुक्ती

जळगाव, प्रतिनिधी | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातापदी आज पुन्हा एकदा डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे आता डीनपदाचा संभ्रम संपुष्टात आला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अतिशय उत्तम कामगिरी बजावली होती. यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांचे अथक परिश्रम कारणीभूत होते. दरम्यान, मध्यंतरी अचानक डीन पदावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पदावर २६ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक मिलींद फुलपाटील यांच्याकडे डीनपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. तर डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे औषधशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून बदली झाली होती. फुलपाटील यांनी बरेच दिवस कार्यभार सांभाळला नव्हता. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये खात्याचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी या संदर्भातील आदेश आज पारित केले आहेत. यात डॉ. रामानंद यांनी तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे नमूद करण्यात आले आहे.

Protected Content