मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.
लोणावळा येथील ओबीसी आरक्षण चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. यात विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, ”मी अशा भागात राहतो, जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले, तर परत जाऊ देणार नाही.” याप्रसंगी व्यासपीठावर बसलेले भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ”एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा”, असे वक्तव्य केले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी ”आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशार्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे”, असे वक्तव्य केले होते. या माध्यमातून त्यांनी शिवसेनेलाच टोला मारला होता.
नेमक्या याच वक्तव्याचा धागा पकडून माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या संदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की,” सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार !” या माध्यमातून त्यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्याचे दिसून आले आहेत.
सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 28, 2021