महापॉवर-पेद्वारे तब्बल २१८ कोटींचा वीजबिल भरणा

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात प्रामुख्याने निमशहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे, तसेच लहान व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ या पेमेंट वॉलेटमधून पश्‍चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख ५४ हजार २९४ वीजग्राहकांनी २१७ कोटी ४६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आतापर्यंत ४५३ जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरू केले असून, गेल्या वर्षात या वॉलेटधारकांना कमिशन म्हणून तब्बल १ कोटी २७ लाख ७१ हजार ४७० रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावा यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे.
वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे बिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो. हे वॉलेट मोबाइल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. बिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे.

‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय किंवा उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजुरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून बिलाचा भरणा करून घेता येतो.वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर तत्काळ ‘एसएमएस’ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-इनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसुलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.

Protected Content