लुटीचा प्रयत्न करणारे पोलीस कोठडीत

भुसावळ प्रतिनिधी । ट्रक चालकाला लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या चार संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना उत्तर प्रदेशातील एका ट्रक चालकाने महामार्गावर काही युवक ट्रक अडवून लुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली. यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी शोध मोहीम राबवली.

याबाबत वृत्त असे की, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास वरणगावकडे जाणार्‍या उड्डाणपुलावर एका ट्रक चालकाला लुटण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती गस्तीवर असणार्‍या पोलिसांना मिळाली होती. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये तसेच कर्मचारी विनोद डोळे व होमगार्ड संदीप सोनवणे हे गस्तीवर होते. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहून दरोड्याच्या प्रयत्नांत असलेल्या संशयितांनी पळ काढला. पोलिसांनी शेतात पाठलाग करुन अक्षय वसंत कुलकर्णी (वय २३, रा. लक्ष्मी नारायण नगर, न्यू विवेकानंद स्कूल भुसावळ), कुणाल प्रकाश तिवारी (वय २७, रा.शांती नगर भुसावळ) तसेच दत्त नगरातील १७ वर्षीय अल्पवयीन, अशा तीन जणांना ताब्यात घेतले. तर मुज्जमिल शेख व आवेश शेख (दोन्ही रा. भुसावळ) हे दुचाकीवरून फरार झाले. त्यांना काही वेळातच अटक करण्यात आली.

या प्रकरणी एकूण चार संशयीतांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी देण्यात आली. तर अल्पवयीन बालकाला जळगावला हजर केले जाणार आहे.

Protected Content