जळगाव प्रतिनिधी । नरेंद्र मोदी यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळेच कोरोना संकटात, सगळा देश घायकुतीला आलेला आहे. एका अडचणीतून दुसऱ्या अडचणीत सामान्य माणूस पिळून निघतोय. हे परिणाम बेपर्वा धोरणाचेच आहेत अशी टिका आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
जिल्हा दौऱ्यात फैजपूर येथील कार्यक्रम आटोपून जळगावात परतल्यावर पद्मालय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे आदी उपस्थित आहे. पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, निट विचार केल्यावर लक्षात येते की, कोरोनाची सुरूवात झाली तेव्हाच पुरेशी दक्षता घेतली गेली नाही. परिस्थितीचे गांभीर्य मोदी सरकारच्या लक्षात आलेच नाही. अशीच बेपर्वाही पुढे दुसऱ्या लाटेपर्यंत कायम राहिली. अत्यंत काटेकोर नियोजन व आरोग्य यंत्रणेतील मुलभूत सुधारणांवर जोर दिला असता तर दुसऱ्या लाटेत बळींची संख्या कमी करता आली असती. कोरोना प्रसाराचा वेग रोखता आला असता. मात्र मोदी सरकार आपल्याच एकलकोंड्या धोरणा मशकुल राहिले. त्यामुळे राज्यांपुढचे आर्थिक संकटही गंभीर झाले. लसींचा तुटवडा व वितरणाचे नियोजन या सरकारच्या लक्षात आलेच नाही. त्यामुळे सुध्दा राज्यांचे हाल झाले.
दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले यांनी काँग्रेसची यापुढची भूमिका आक्रमक राहिल असे स्पष्ट करतांना काँग्रेसच्या नेतृत्वाने जळगाव जिल्ह्याला वाळीत टाकले असल्याची टिका खोडून काढली. नेतृत्वाने या जिल्ह्याला वाळीत टाकले असते तर आज मी येथे आलोच नसतो. असे ते म्हणाले. या पत्र परिषदेत मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणावरही त्यांनी टिका केली. देशातील राज्यांबद्दलची मोदी यांची भूमीका आपपरभावाची असल्याची टिकाही त्यांनी केली.