Home Cities जळगाव जळगाव महापालिकेच्या सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चीत : दोघांचा निर्णय प्रलंबीत...

जळगाव महापालिकेच्या सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चीत : दोघांचा निर्णय प्रलंबीत !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची यादी आज छाननीत निश्चीत करण्यात आली असून दोन नावांचा निर्णय मात्र नंतर होणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांसाठी विविध पक्षांनी आपापली नावे दिली होती. यात सात जागांसाठी एकूण नऊ जणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यात भाजपच्या वतीने चार जागांसाठी पाच नावे देण्यात आली होती. यात पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, रमेश मताणी, सुभाष शौचे आणि राहूल वाघ यांच्या नावांचा समावेश होता. पक्षाला चार जागा मिळणार असतांना पाच नावे सादर करण्यात आल्याने यातील एक नाव बाद ठरणार हे निश्चीत होते. शिवसेनेच्या वतीने हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे ही दोन नावे सादर करण्यात आली होती.

शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने मात्र मोठा घोळ निर्माण झाला. विद्यमान गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित सोळुंके यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. तर ते गटनेते नसल्याचे पत्र देत अर्शनाबी खाटीक यांनी पक्षाचे महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला होता. यात दोन्ही गटांनी आपलाच प्रस्ताव मंजूर होणार असल्याचा दावा केल्याने पेच निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमिवर, आज महापालिकेत महापौर दीपमाला काळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि विविध गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. यात सुभाष शौचे आणि राहूल वाघ यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्यांना दोन एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. तर, शिवसेना-उबाठा पक्षाच्या गटनेतेपदाचा वाद हा विभागीय आयुक्तांकडे गेला असल्याने त्यांचा प्रस्ताव देखील प्रलंबीत ठेवण्यात आला आहे.

आजच्या छाननीतून भाजपचे डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे व रमेश मताणी तर शिवसेनेचे हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळणार असल्याचे निश्चीत झाले आहे. तर, भाजपची एक जागा आणि शिवसेना-उबाठाची एक जागा यांच्याबाबतचा निर्णय हा येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound