सिंधुदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद देखील पाहायला मिळत आहे.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना ही बातमी माहिती होताच त्यांनी राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. बांधकामात हरकती असताना देखील याचे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आमदार नाईक हे संतप्त होत त्यांनी हातात रॉड घेऊन थेट त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयात एंट्री करताच प्रत्येक दालनात असलेल्या टेबलवरील काचा फोडल्या. खिडक्या व खुर्च्या देखील फोडल्या. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला.
ते म्हणाले की, शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे. ही दुःखद घटना असून, एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.