नगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मुस्लीम राजवटीत तोडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करीत हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्या अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ नामकरण करा आणि स्वाभिमानी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करा, असे आव्हान भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
दोन दिवसापूर्वी पडळकरांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत सभा घेतली, त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आ. रोहित पवार या आजोबा-नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखले. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊन इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉंच करण्याचा इव्हेंट वाटतो, अशी टीका पडळकरांनी केली आहे.
शिवाय आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही ही होळकरशाहीचा? त्यामुळे अहमदनगर ऐवजी ‘अहिल्यानगर’ अशा नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार नसून महाविकास आघाडीचे स्वाभिमानी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करा, अशी पत्रादारे मागणी करीत पडळकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडीतील सभेनिमित्त शरद पवारांवर निशाणा साधला आहे.