नगरदेवळा उपसरपंच अपात्र प्रकरणात मुदतवाढ अर्ज नामंजूर

 

 

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केलेल्या आदेशाला नासिक विभागीय अप्पर आयुक्त यांनी (दि.२०) आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. परंतु स्थगिती ला मुदतवाढ मिळावी म्हणून विलास पाटील यांनी केलेला अर्ज नामंजूर केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगांव यांनी तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी यांच्या बाजूने निकाल देत सामनेवाला याला सदस्य पदावरुन अपात्र घोषित केले होते. त्यावर विलास पाटील यांनी अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले असता त्यावर सुनावणी होऊन अप्पर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशाला दि. २० ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली होती. परंतु दि. २० ऑगस्ट रोजी विलास पाटील यांच्या वकिलांना याप्रकरणी कागदपत्रं उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच युक्तिवादास बराचसा कालावधी लागणार असल्याने स्थगिती आदेश कायम ठेवावा असा लेखी युक्तिवाद केला होता. त्यावर सामनेवाला यांच्या वकिलाने स्थगिती अर्जास हरकत घेतली असून लेखी युक्तिवाद केला. ग्रामविकास अधिकारी यांनीही जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश योग्य व कायदेशीर असून सरकारी गावठाण जागेवर अतिक्रमण केले असल्याचे लेखी दिले आहे. हा सर्व झालेला युक्तिवाद बघता अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी स्थगिती च्या मुदतवाढ साठी केलेला अर्ज नामंजूर केला आहे. तसेच स्थगिती ला मुदतवाढ न मिळाल्याने जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशान्वये ते आज रोजी अपात्र आहेत. दिपक परदेशी यांच्यातर्फे अॅड. प्रल्हाद बी. पाटील पाचोरा यांनी कामकाज बघितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!