भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पू.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात एन.मुक्टो. स्थानिक शाखा आयोजित सहविचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी अध्यक्ष प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी प्राध्यापकांचे प्रश्न सोडवणारी एन.मुक्टो. एकमेव संघटना असल्याचे प्रतिपादन केले.
ते बोलतांना म्हणाले की, “पाचवा वेतन आयोग असो, सहावा वेतन आयोग असो, वा सातवा वेतन आयोग असो प्रत्येक वेतन आयोगाच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी एन.मुक्टो. ही प्राध्यापकांची आपली एकमेव संघटना असून संघटना असून एका विशिष्ट जाती धर्माची नाही. एका विशिष्ट पक्षाचा झेंडा संघटनेने हाती घेतलेला नाही तर प्राध्यापकांचे निपक्षपातीपणे प्रश्न सोडविण्याचे काम संघटना करीत आहे. प्राध्यापकांचे प्रमोशनचे प्रश्न असतील पी.एचडी.च्या संदर्भातील प्रश्न असतील किंबहुना डीसीपीएसच्या संदर्भातले प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांना उजाळा देणारी ही संघटना आहे. महाराष्ट्र सरकार असो वा केंद्र सरकार सर्वांकडे प्रश्नांची मांडणी करून पदरात पाडून घेणारी ही संघटना आहे.
या संघटनेचा इतिहास अतिशय जुना आहे. याच महाविद्यालयातून संघटनेचे नेतृत्व निर्माण झाले.” डॉ.वाय.आर.वाणी कै.के.एम.पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून डॉ.अनिल पाटील सभागृहाला यांनी मार्गदर्शन केले. निमित्त होते, भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील एन.मुक्टो. स्थानिक शाखेने आयोजित केलेल्या सहविचार सभेचे.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, खजिनदार प्रा.ई.जी.नेहेते, जिल्हा अध्यक्ष डॉ.के.जी.कोल्हे, सचिव डॉ.ए.डी.गोस्वामी केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य डॉ.ताराचंद सावसाकडे, केंद्रीय आणि जिल्हा कार्यकारणीचे सदस्य डॉ.विजय सोनजे, स्थानिक शाखेचे सचिव डॉ.पी.ए.अहिरे व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्कार व स्वागत समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी सहविचार सभेची पार्श्वभूमी सभागृहासमोर मांडली. त्यात त्यांनी “प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. आपली संघटना अतिशय जुनी असून आपली नाळ आपल्या संघटनेशी जोडलेली आहे. आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता संघटनेची एकजूट राहूया. असे आवाहन करून आजची सभा घेण्यामागचा उद्देश प्राध्यापकांना संघटनेच्या चालू घडामोडी, विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक याची माहिती मिळावी हा आहे.” असे सांगितले.
प्रास्ताविकानंतर जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ.के.जी .कोल्हे यांनी सभागृहाला मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी, “संघटनेचा लेखाजोखा मांडून संघटनेचे महत्त्व पटवून दिले. नाहाटा महाविद्यालयातील स्थानिक शाखा अतिशय प्रबळ आहे. या महाविद्यालयातूनच संघटनेचा प्रवास सुरू झालेला आहे.” याची आठवण त्यांनी करून दिली.
नंतर केंद्रीय कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष प्रा. एकनाथ नेहेते यांनी विद्यापीठ प्राधिकरणाच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात सभागृहाला मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी, “पदवीधर मतदार संघ, प्राध्यापक मतदार संघ, आणि विभाग प्रमुख मतदारसंघ, याबाबतची माहिती देऊन याची नोंदणी कशी करावी याबाबतची माहिती दिली शिवाय अधिसभा, विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद इत्यादी बाबतची माहिती देऊन आपली भूमिका विद्यापीठात किती महत्त्वाची आहे. हे सभागृहाला पटवून दिले. शेवटी प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न उत्तरांनी कार्यक्रम संपन्न झाला. प्राध्यापकांनी प्रश्न उपस्थित केले. मान्यवरांनी प्रश्नांची उत्तरे दिली. प्रा.डॉ.स्मिता चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.