दिल्लीत ऐनवेळी मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले : केजरीवाल

arvind kejriwal

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत मुस्लिमांनी शेवटच्या क्षणी आम्हाला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. मुस्लिम मते काँग्रेसकडे सरकली नसती तर आम्ही दिल्लीतील सातही जागांवर विजयी झालो असतो, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तर दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसला कशी गेली याचा आम्ही शोध घेत असल्याचे देखील केजरीवाल यांनी सांगितले.

 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी हा दावा केलाय. केजरीवाल यांच्या मते दिल्लीतील सातही जागांवर ‘आप’च्या विजयाची आशा होती. मात्र ऐनवळी डाव पलटला. अखेरच्या क्षणी ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला शिफ्ट झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. ‘आप’ला किती जागा मिळणार, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे केजरीवाल यांनी टाळले. तसेच मतदानाच्या ४८ तासांपर्यंत आम्हाला वाटले होते की, ‘आप’ सर्व जागा जिंकेल. मात्र ऐनवेळी सर्व मते काँग्रेसला गेली. निवडणुकीच्या एक दिवसआधी हे घडले आहे. दिल्लीत १२-१३ टक्के मुस्लीम मते आहेत. दरम्यान, केजरीवाल यांच्या वक्तव्यावर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी सडकून टीका केली आहे. केजरीवाल यांना नेमके काय म्हणायचे आहे हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया शीला दीक्षित यांनी दिलीय.

Add Comment

Protected Content