सोमय्यांसमोर शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणा युध्द !

रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते किरीट सोमय्या आज रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांची पाहणीसह चौकशी करण्यासाठी कोलई गावात आल्यानंतर सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुध्द रंगल्याचे दिसून आले.

भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोर्लई गावात पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी ते कोर्लईत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सोमय्यांसोबत भाजप कार्यकर्ते येत असल्याचं माहीत पडताच शेकडो शिवसैनिकांनीही कोर्लईच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर गर्दी केली. सोमय्या येताच शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनीही घोषणा देत सोमय्यांचं समर्थन केलं. काही शिवसैनिकांनी सोमय्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या कड्यातच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेले. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर होते.

पंचायत समितीच्या कार्यालयात सोमय्या गेले. त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात ते कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना नमस्कार केला. खुर्चीत बसले. तेवढ्यात प्रशांत ठाकूर यांनी खिशातून एक पत्रं काढलं आणि ते मिसाळ यांना दिलं. त्यानंतर ते कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी कार्यालयात आल्यानंतर आमच्याशी एका शब्दानेही चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया सरपंच मिसाळ यांनी दिली आहे.

सोमय्या पंचायत कार्यालयाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली. पुन्हा शिवसैनिकांनी सोमय्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण सोमय्या तात्काळ गाडीत बसले आणि वायुवेगाने त्यांची गाडी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या दिशेने गेली. सोमय्या निघून जाताच सोमय्या आले त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडून शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं. ग्रामपंचायतीचं शुद्धीकरण केल्याचं सरपंचांनीही सांगितलं.

 

Protected Content