पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील तरुण सराफ व्यावसायिक पुनमचंद गुलाबचंद वर्मा यांचा खून झाल्याचे उघडकीस आले असून व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “पहूर येथील रहिवासी पुनमचंद गुलाबचंद वर्मा (वय 42) यांचे लोहारा तालुका पाचोरा या ठिकाणी मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकानातून असून काल लोहारा येथील आठवडे बाजार असल्याने दुकान बंद करून ते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लोहारा येथून एकुलती मार्गे मोटार सायकल क्रमांक एम. एच. 19 बी वाय 9821 ने पहूर येथे येत असताना गोगडीच्या पुलाजवळ अज्ञात आरोपींनी त्यांचा तीक्ष्ण व धारदार हत्याराने निर्गुण खून करून अज्ञात आरोपींनी तेथून पळ काढला.
सराफा व्यावसायिकाचा खून करीत पहूर पोलीस यांच्यापुढे तपासाचे आव्हान उभे केले आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब, पाचोऱ्याचे उप विभागिय पोलीस अधिकारी भारत काकडे साहेब, यांनी पहूर येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पुढील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांना तातडीने तपासाची चक्रे फिरविण्याचा आदेश दिला असून वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मयत पुनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या शरीरावरील छातीवर, पोटावर आणि पाठीवर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केले असल्याने त्यांचा खून झाल्याचे आढळून आल्याने प्रकाश कांतीलाल वर्मा (वय 48 वर्षे) (धंदा सोनार काम राहणार व्यंकटेश गोल्ड, देवडा कॉम्प्लेक्स कासारी बाजार औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात पहूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर मयत पुनमचंद गुलाबचंद वर्मा यांचे पोस्ट मोर्टेम जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येवुन पहूर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहे तसेच आरोपींना पोलीस प्रशासनाने तत्काळ जेरबंद करण्याची मागणी नातेवाईक यांनी केली आहे.