आनंदी जीवनासाठी ताण -तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे -हरिभाऊ राऊत

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आनंदी जीवन जगण्यासाठी ताण-तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख हरिभाऊ राऊत यांनी केले. आर.बी.आर. कन्या विद्यालयात आयोजित सहाव्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते.

दैनंदिन जीवन जगत असताना ताण-तणाव येणे स्वाभाविक आहे , परंतु सुयोग्य व्यवस्थापना द्वारे आपण तणावग्रस्त परिस्थितीतून बाहेर येऊन जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो , असेही ते म्हणाले. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आरबीआर कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन यांनी भूषविले. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नेहा सुनील देशमुख या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे यांनी यावेळी सखोल मार्गदर्शन केले. गोकुळ महाजन यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयाची तयारी कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक सुवर्णा मोरे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत सोनाळकर यांनी केले. आभार केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी मानले. यावेळी विषय तज्ज्ञ पंकज रानोटकर यांनी मनोगत व्यक्त केले. माझी आदर्श शाळा या विषयावर लेले नगर प्राथमिक विद्यामंदिर येथील शिक्षक महेश मोरे यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पहूर केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आर. बी. आर कन्या विद्यालय , संतोषी माता नगर प्राथमिक शाळा आणि हिवरी – हिवरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Protected Content