स्वातंत्र्यदिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज एका महिलेने ध्वजारोहण सोहळा सुरू असतांनाच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, आज शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असतांना मागील बाजूला एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी सतर्कता दाखविल्यामुळे संबंधीत महिलेला इजा झाली नाही. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक घडलेल्या या प्रयत्नामुळे प्रचंड खळबळ उडाली.

दरम्यान, संबंधीत महिला ही जामनेर तालुक्यातील नेरी येथील सुनील गुजर या व्यापार्‍याची पत्नी असून त्यांचे नाव वंदना सुनील पाटील (गुजर) असे आहे. सुनील गुजर यांनी जामनेरातील काही व्यापार्‍यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील काहीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप सुनील गुजर आणि त्यांच्या पत्नीने आधीच केला होता. यानंतर त्यांनी याबाबत आधी जळगावात पत्रकार परिषद घेऊन आणि नंतर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले देखील होते. यानंतर गुजर यांच्या पत्नीने आज थेट शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतांनाच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

दरम्यान, शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकारांशी ना. गुलाबराव पाटील यांना या संदर्भात प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, सुनील गुजर नावाच्या इसमाच्या या प्रकरणाची मला पूर्ण माहिती आहे. या प्रकरणी आधीच पूर्ण चौकशी झालेली आहे. आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Protected Content