


नवी दिल्ली-वृत्तसेवा | महाराष्ट्रात नुकत्याच घेण्यात आलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल हा नागपूर खंडपीठाने जाहीर केल्यानुसार म्हणजेच 21 डिसेंबर रोजीच लागणार असल्याचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. नियोजीत कार्यक्रमानुसार याचा निकाल लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी लागणार होता. तथापि, या निवडणुकीत ज्या प्रभाग वा लोकनियुक्त नगराध्यक्षपदाबाबत न्यायालयात आक्षेप घेण्यात आले होते. तेथील मतदान निवडणूक आयोगाने 20 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले. यामुळे 2 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल देखील दुसऱ्या टप्प्यानुसार म्हणजेच 21 डिसेंबर रोजी लागणार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता.
या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज तातडीने सुनावणी घेण्यात आली. यात न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार म्हणजेच 21 डिसेंबर रोजीच सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याचा निकाल दिला आहे. यामुळे निकालाबाबत सुरू असलेला संभ्रम दूर झाला आहे.



