जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिका प्रशासनाने गुरुवारी नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील ५ दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानदारांविरूध्द ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही टप्याटप्याने बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची दुकाने व हॉस्पिटल सील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.
शहरातील अनेक दुकानदावर व हॉस्पिटल चालकांनी आपल्या पार्किंगच्या जागेत विविध व्यावसायिक वापर सुरु केला आहे. त्यामुळे शहरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पार्किंगचा व्यावसायिक वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांवर महापालिकेकडून अनेक वेळा कारवाईचा बडगा उगारण्यात आला परंतु राजकीय दबावामुळे आजपर्यंत कारवाई होत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले. काही महिन्यांपुर्वी देखील बेसमेंट पार्किंगचा विषय चांगलाच गाजला होता. माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी देखील बेसमेंट पार्किंगची कारवाई करण्यात यावी, याविषयी पाठपुरावा केला. तरी देखील कारवाई होऊ शकली नव्हती, यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचे अनेक वेळा उघड देखील झाले होते. आता महापालिकेवर प्रशासकीय राज असून आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी हा विषय गांभिर्याने घेत गुरुवारी अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला आदेश देत ५ दुकाने सील केल्याची कारवाई केली.