ब्रेकींग : राष्ट्रीय महामार्गावर वृध्द पित्याला चिरडले; मुलगा गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ट्रक्टरला ओव्हरेटेक करण्याच्या प्रयत्नात असतांना दुचाकीवर मागे असलेले ७८ वर्षीय वृध्द व्यक्ती रोडवर पडले. तेवढ्यात अज्ञात वाहनाने त्यांना चिरडल्याने जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर घडली आहे. यावेळी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. युसूफ शेख ईस्माईल खाटीक (वय-७८, रा. पारोळा) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव असून अस्लम शेख युसूफ खाटीक (वय-४४, रा. पारोळा) हे गंभीर जखमी झाले आहे.

पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळे तपासणी करण्यासाठी आलेले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते रूग्णालयातच होते. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी त्यांची घरी जाण्यासाठी सुटका झाली होती. त्यामुळे अस्लम शेख युसुफ खाटीक त्यांचे वडील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्यासोबत दुपारी १ वाजता ते दुचाकीने (क्र. एमएच १९, ईएफ ७५२४) घरी पारोळा येथे परत जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. त्यावेळी मागे बसलेले त्यांचे वडील युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर नागरीकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून तसेच पोलीस कर्मचारी यांनी मृतदेहाचा पंचनामा करून खागसी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी दिसून आली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content