पालिकेला ‘खड्डे दाखवत’ मुंबईकरांनी केली बक्कळ कमाई

prathamesh

 

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील एका जागरुक तरुणाने महापालिकेला खड्डे दाखवून बक्कळ कमाई केली आहे. ‘खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’ या पालिकेच्या मोहिमेत खड्डय़ांबाबत सर्वाधिक ५० तक्रारी दाखल करत शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या प्रथमेश चव्हाण याने सर्वात जास्त म्हणजे पाच हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.

त्याने केलेल्या तक्रारीतील १० खड्डे पालिकेला २४ तासात बुजवणे अशक्य झाले असून उर्वरित खड्डय़ांसाठी बक्षीस देणे पालिकेला भाग पडले आहे. पालिकेने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबवली. यात तक्रार केल्यानंतर २४ तासात खड्डे बुजवले नाही तर ५०० रुपये अधिकाऱ्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशातून दिले जातील, असे प्रशासनाने जाहीर केले होते. यात सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ज्या खड्डय़ांच्या तक्रारी २४ तासात बुजवल्या गेल्या नाहीत अशा १५५ जणांना पालिकेला बक्षीस द्यावे लागले. आतापर्यंत सर्वाधिक किमतीचे बक्षीस प्रथमेश चव्हाण याने पटकावले आहे. त्याला आतापर्यंत पाच हजाराचे बक्षीस मिळाले आहे. एका व्यक्तीला केवळ दोनच तक्रारी करता येतील, अशी अट पालिकेने घातली होती. मात्र त्यालाही आव्हान देत प्रथमेशने चक्क ५० तक्रारी करून पालिकेच्या यंत्रणेतले दोषच दाखवून दिले आहेत. त्याने केलेल्या सगळ्या तक्रारीतील खड्डे पालिकेने बुजवले आहेत. मात्र जे खड्डे २४ तासात बुजवले गेले नाही, त्यासाठी रस्ते विभागातील संबंधित अभियंत्यांना त्याला १० खड्डय़ांसाठी ५००० रुपये द्यावे लागले आहेत.

Protected Content