बंगळुरू वृत्तसंस्था । अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्सचा सहा धावांनी पराभव करून आयपीएलच्या या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली.
रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं. खरं तर, मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी जोरदार फटकेबाजी केली. यानंतर कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.
यानंतर रॉयल चॅलेंजर्सची सुरवातदेखील अडखळत झाली. मोईन अली फक्त १३ धावांवर बाद झाला. पार्थिव पटेल २२ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि एबी डी व्हिलियर्स यांनी फटकेबाजी केली. विराटनं ३२ चेंडूत ४६ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतरही एबीडीनं एकहाती किल्ला लढवला. फटकेबाजी सुरूच ठेवत त्यानं ४१ चेंडूत नाबाद ७० धावा कुटल्या. मात्र, अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्यानं बेंगळुरूला लक्ष्य गाठता आलं नाही. त्यांचा डाव २० षटकांत पाच बाद १८१ धावांवर आटोपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक म्हणजेच चार षटकांत अवघ्या २० धावा देऊन तीन बळी घेतले.