नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचे आज निधन झाले.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री दिग्गज नेते मुलायमसिंग यादव यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
२२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तरप्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील सैफई गावातल्या एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले मुलायमसिंग यांनी आपली कारकिर्द शिक्षण म्हणून सुरू केली. मात्र राजकारणाची ओढ असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. १९६७ मध्ये तिशीच्या उंबरठ्यावर असतांना ते पहिल्यांदा आमदार बनले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९२ साली त्यांनी जनता दलातून बाहेर पडून समाजवादी पक्षाची स्थापना केली. ते तीन वेळेस उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. तर त्यांच्याच प्रयत्नांनी २०१२ साली त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे संपूर्ण बहुमत मिळवून उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यांच्या निधनाने उत्तरप्रदेशच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याचे मानले जात असून राजकीय वर्तुळातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.