संत मुक्ताई पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान

मुक्ताईनगर प्रतिनिधी | मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या संत मुक्ताई पालखीचे आज पहाटे विशेष बसद्वारे पंढरपूर येथे प्रस्थान झाले. कोविडमुळे वारीवर मर्यादा असल्याने शासकीय नियमांचे पालन करून आज पालखी निघाली.

दर वर्षी आषाढी पंचमी निमित्ताने संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. तथापि, बसने ही वारी पंढरपूरकडे नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची ३१२ वर्षांपासूनची परंपरा आहे. दूरवरचे भाविक दिंड्यांसह या सोहळ्यात सहभागी होत असतात. ७०० किमीचे अंतर ३३ दिवसांत पार करून विठुरायाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे गत वर्षांसह यंदा बसने वारी होत आहे.

दरम्यान, याआधी सोमवार दिनांक १४ जून रोजी श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे पालखीचे प्रतिकात्मक प्रस्थान झाले होते. ही पालखी नवीन मंदिरात १८ जुलैपर्यंत मुक्कामी होती. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास विधीवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्रभैय्या पाटील हभप हरणे महाराज यांच्यासह वारकरी उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी अत्यंत उत्कृष्ट पध्दतीत सुशोभित करण्यात आलेल्या बसमध्ये ठेवण्यात आली. यानंतर शासकीय नियमानुसार मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

Protected Content