बनावट बियाण्यांची विक्री : दोघांना अटक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नामांकीत कंपन्यांच्या कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री करणार्‍या दोघांना येथे अटक करण्यात आली असून यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, दिनांक १ जूनपासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री सुरू झाली असून काही भामटे बनावट बियाण्यांची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक करत असल्याने दरवर्षी अनेक शेतकर्‍यांना यामुळे मोठा फटका बसत असतो. सदर बाब लक्षात घेऊन यंदा कृषी खात्याने आपल्या मोहिम अधिकार्‍यांच्या माध्यमातून यावर नजर ठेवली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके निरिक्षक तसेच मोहिम अधिकारी विजय दगू पवार यांना मुक्ताईनगरात कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. याबाबतची माहिती पोलीस सूत्रांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली.

याच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एम जावेद पेट्रोल पंपाजवळच्या बस थांब्याजवळ प्रदीप शामराव पाटील ( रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) आणि गोपाळ वामन जवरे ( रा. जवळा बाजार, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा ) या दोन जणांजवळ बनावट बियाणे आढळून आलेत. यात अंकुर सीडस आणि एचटीबीटी यांची एकूण ५६, ७०० रूपयांची बनावट बियाणे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई काल दुपारी करण्यात आली.

या अनुषंगाने या दोन्ही जणांच्या विरोधात रात्री उशीरा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भाग ५ सीसीटिएनएस क्रमांक १९३ / २०२२ भा.द.वि कलम ४२०,३४ अत्यावश्यक वस्तु अधि, १९५५ चे कलम ३,९, बियाणे अधि नियम
१९६८ चे कलम १९८३ १०,१५,१६,१७ बियाणे नियत्रंण आदेश १९८३ चे कलम ३,४,७,८,९, बिज अधिनियम ७ (ए) ७ (सी) ७ (डी) १४(ई), पर्यावरण संरक्षण अधि १९८६ चे कलम ८, ७ पर्यावरण संसक्षण अधिनियम १९८३ चे कलम ७ (१) (४), ८,१० चे
उल्लघन, महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा २००९ चे कलम २ (१) (३) (८) (१२) ,११ (१),१२ (१), चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई ही मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक बोरकर, परवीन तडवी व पो. ना. विजय पढार यांच्या पथकाने केली. दरम्यान, या दोघांच्या चौकशीतून बनावट बियाणे विक्री करणारे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

Protected Content