मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथील संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांना पंढरपूर येथे वारकरी संप्रदायातील अत्यंत प्रतिष्ठेचा २३ वा सद्गुरू सोपानकाका देहूकर संतप्रभृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पंढरपूर येथे देहूकर वाड्यात आचार्य रामकृष्णदास लहवितकर ट्रस्ट व देहूकर फडाच्या वतिने यावर्षीचा सद्गुरू सोपानकाका देहूकर संतप्रभृती पुरस्कार संत तुकाराम महाराज वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अँड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील फेटाबांधून सन्मानपत्र,पंचवस्त्र , स्मृती चिन्ह व ५१०००/- रोख देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी देहू संस्थान चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे,चैतन्य महाराज देगलूरकर, केशवदास महाराज नामदास,शिवाजीराव मोरे , मुरलीधर पवार,अनिल काका बडवे ,अभय महाराज अमळनेरकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, रविंद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे , व वारकरी भाविक आदी मान्यवर उपस्थित होते.
ट्रस्टचे निमंत्रक गंगाधर जाधव यांनी प्रास्ताविक , रामकृष्ण महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या भाषणात कर्म ,ज्ञान व भक्ती यांचा समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे.लोकांना संतांच्या चरणाजवळ पोहचवणे ही संत सेवाच आहे.अशा समन्वयवादी वारकरी संप्रदायाची सेवा भैय्यासाहेब रविंद्र पाटील सदैव निःस्पृहतेने करीत आहेत निश्चितच ट्रस्टने दिलेला पुरस्कार योग्य व्यक्ती ला् दिल्याबद्दल गौरवोद्गार काढले. पुरस्काराला उत्तर देतांना भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात मिळालेला हा पुरस्कार माझा सन्मान नसुन आईसाहेब मुक्ताबाई फडाची निष्काम सेवा करणार्या वारकरी भाविकांचा हा सन्मान आहे असे भावोत्कट प्रतिपादन केले. देहूकर फड व ट्रस्ट चे आभार मानले. पुरस्कार ची रक्कम मुक्ताबाई चरणी अर्पण केल्याचे जाहीर केले. संतविर बंडातात्या महाराज कराडकर यांनी अध्यक्षीय भाषणात पुरस्काराची व्यापकता अधिक व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली. प्रमोद अण्णा जगताप यांनी सुत्रसंचलन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.