मुक्ताईनगर, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोथळी येथे खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेणार आहेत.
याबाबत वृत्त असे की, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे https://livetrends.news आज जिल्हा दौर्यावर असून ते मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. दरम्यान आज सकाळी कोथळी येथे खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेणार आहेत. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह पक्षाचे नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच कोथळी येथे येणार असून ते खडसेंच्या सुनेशी वार्तालाप करणार असल्याची घटना ही महत्वपूर्ण मानली जात आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी संवाद साधून यात राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती दिली आहे. तर, ताज्या घडामोडींचा मागोवा घेतला असता यात विशेष वार्तालाप होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जळगाव महापालिकेत यामुळे आधीच हादरा बसला असून अलीकडेच मुक्ताईनगर नगरपंचायतीतही भाजपचे सदस्य शिवसेनेत दाखल झाले आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषदेतही सत्तांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. तर या सर्व गदारोळात खासदार रक्षाताई खडसे यांच्या आगामी वाटचालीबाबत नेहमीच संभ्रम व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमिवर, फडणवीस यांची संभाव्य भेट ही महत्वाची मानली जात आहे.
कोथळी येथे फडणवीस यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली असल्याचेही दिसून येत आहे. अर्थात, यात या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याबाबतची उत्सुकता आहेच.