संचारबंदी : पोलीस कर्मचाऱ्याने भटक्या कुटुंबांना दिले मोफत अन्नधान्य

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूशी युद्ध लढत असतानाच हातावर पोट घेऊन जगणार्‍या परप्रांतीय भटक्या व्यक्तींना काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे बघत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मुकेश घुगे यांनी खाकी वर्दीतील दर्दी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवत बोदवड चौफुलीवर सर्व कुटुंबांना किमान पंधरा दिवस या वर पुरेल एवढे अन्नधान्य आपल्या स्वखर्चातून मोफत वाटप केले.

पोलीस कॉन्स्टेबल मुकेश घुगे यांनी बोदवड चौफुलीवर आलेल्या परप्रांतीय कामगार कुटुंबांना स्वखर्चातून अन्नधान्य मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे , व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळुंके यांचे हस्ते वाटप केले. खाकी वर्दीतील दर्दी व्यक्तिमत्व म्हणून पोलीस कॉन्स्टेबल मुकेश घुगे यांच्या कार्याबद्दल संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे. याप्रसंगी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत महाजन व ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम व युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे देखील उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू असल्याने उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. हात मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील परप्रांतीय काही कुटुंब गेल्या महिनाभरापासून मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीजवळील मोकळ्या पटांगणात तंबू ठोकून मिळेल ते काम करून आपली उदरनिर्वाह करत आहेत. मात्र संचारबंदी लागू झाल्यापासून कामेदेखील बंद पडली व उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. लहान मुले, पत्नी यांचा सांभाळ करत असताना मजुरांची त्रेधातिरपाट उडत आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मुकेश घुगे यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन त्यांना स्वखर्चातून डाळ, तांदूळ साखर, गहूचे पीठ, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू किमान पंधरा ते वीस दिवसाच्या वर पुरेल इतके घेऊन वाटप केले. घुगे यांच्या कार्याबद्दल संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गौरवोद्गार काढले जात आहेत.

Protected Content