लहान मुलांसाठी सुपर स्पेशालिटी बेडची व्यवस्था करा : शिवसेना

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्गाची शक्यता असल्याने ग्रामीण रूग्णालयात बालकांसाठी सुपर स्पेशालिटी बेडची व्यवस्था करण्याची मागणी शिवसेनेतर्फे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केली आहे.

शिवसेनेचे भुसावळ शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ.मयूर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार यांच्याशी चर्चा करतांना विविध विषय मांडले. यात त्यांनी बालकांसाठी सुपर स्पेशालीटी बेड ग्रामीण रुग्णालयात राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी केली.

या संदर्भात बबलू बर्‍हाटे म्हणाले की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवक, बालकांना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहेत.केंद्रात ० ते १ या वयोगटातील नवजात बालकांसाठी २० खाटा राखीव ठेवण्यात याव्यात,नवजात बालकांसोबत मातेला स्तनपानसाठी केंद्रावर वेगळा कक्ष असावा,कोरोनाबाधित बालक व युवकांवर उपचाराची एकच पद्धत असावी आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांना त्यानुसार प्रशिक्षितही करण्यात यावे,बालरोग व इतर तज्ज्ञांचा तातडीने टास्क फोर्सचे गठण करण्यात यावे. संक्रमित बालकांसाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्यांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुलांना होण्याची शक्यता असून, या अनुषंगाने उपाय योजनांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे असे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी कळविले आहे.

Protected Content