ब्रेकींग न्यूज : शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत ईडीच्या ताब्यात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांची मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर त्यांना ईडच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलीक यांच्या पाठोपाठ मविआतील तिसर्‍या मोठ्या नेत्याला ईडीने गजाआड केल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पत्रा चाळ प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी धडक देऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. आधी त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा मारून चौकशी करण्यास प्रारंभ झाला. यानंतर त्यांच्या दादर येथील दुसर्‍या घरीदेखील छापा मारण्यात आला. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाल्यानंतर आज सकाळी लागलीच ईडीचा छापा पडल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ईडीच्या दहा अधिकार्‍यांचे पथक सीआरपीएफच्या जवानांसह संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाले. तेव्हापासून राऊत आणि त्यांच्या कुटुंबाची कसून चौकशी सुरू झाली. चौकशीस प्रारंभ झाल्यानंतर संजय राऊत यांनी काहीही झाले तरी आपण शिवसेना सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, शिवसैनिकांनी त्यांच्या घराजवळ आंदोलन केले. तर मविआच्या नेत्यांनी या कारवाईचा कडाडून निषेध केला.

दरम्यान, हे सारे होत असतांना ईडीच्या अधिकार्‍यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाची कसून चौकशी सुरूच ठेवली. दुपारी तीन वाजेपासून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू झाली. यानंतर अखेर संजय राऊत यांना अटक करण्यात आली. मविआचे माजी मंत्री नवाब मलीक आणि अनिल देशमुख यांना आधीच ईडीने अटक केली असून आता संजय राऊत यांच्या रूपाने महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याला ईडीने अटक केली असून यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.

Protected Content