चाळीसगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी त्वरित उठवावी, यासाठी चाळीसगावात बैलगाडा शर्यत चालक, मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने बैलगाडा घेऊन आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिग्नल चौकात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा बैलगाडा शर्यतीवरील बंदी राज्य सरकारने त्वरित उठवावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना व चाळीसगावच्या वतीने अभुतपुर्व असा आंदोलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवार रोजी करण्यात आले. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांना याबाबतचा निवेदन शर्यत चालक, मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने शनिवार रोजी दिले असता मी शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने केवळ शासन दरबारी याविषयी पाठपुरावा करून थांबणार नाही तर राज्यभरातील बैलगाडा शर्यत चालक मालक व शर्यत शौकीन यांच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले होते.
त्याप्रमाणे सदर आंदोलन हा त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून आंदोलनाला सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे शेतकऱ्यांशी संवाद साधताना हि राजकीय लढाई नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मोठमोठे लोक घोड्याच्या शर्यती लावून हजारो रूपयांची उधळपट्टी करतात. मात्र सरकारला शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यतीलाच विरोध का? असा घणाघाती टीका ही आमदार चव्हाण यांनी केली. बैलगाडा हा शेतकऱ्यांचा छंद असून चारशे वर्षांची याला परंपरा आहे.
त्यामुळे राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली नाही तर हजारो बैलांना सोबत घेऊन चाळीसगावहून मुंबईला आंदोलन धडकेल असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर हि समस्या आता शेतकऱ्यांची नसून याची पूर्ण जबाबदारी मी घेऊन सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. दरम्यान “पेटा हटवा बैल वाचवा’ अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग हा उपस्थित होता.