जळगाव –लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निर्णायक ठरणारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे उत्साहात पार पडली. या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. शहराचे आमदार राजूमामा भोळे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
परिषदेत ४० उद्योजकांशी एकूण ₹१६३६ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून २८४८ रोजगार संधी निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, “ही गुंतवणूक परिषद केवळ गुंतवणुकीसाठी नाही, तर जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार आहे.”
नवीन MIDC क्षेत्र तयार करण्यासाठी कुसुंबा आणि चिंचोली येथे २८५ हेक्टर जागेचे भूसंपादन सुरू असून, ₹२१ कोटींच्या निधीतून ‘उद्योग भवन’ उभारण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्लास्टिक उद्योगांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’साठी विशेष सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गेल्या वर्षी झालेल्या परिषदेत ₹११२६ कोटींच्या करारांपैकी ९ उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले असून ८३९ रोजगार निर्मिती झाली आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत ९०% आणि पंतप्रधान रोजगार योजनेत ११२% यश जिल्ह्याने मिळवले आहे.
आमदार राजूमामा भोळे यांनी उद्योजकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या अडचणी सोडवण्याची हमी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, सूत्रसंचालन अपूर्वा वाणी आणि आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी केले.
या वेळी माजी आमदार कैलास पाटील, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, एमआयडीसी अधिकारी सुनील घाटे, तसेच विविध बँका, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.