उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलाच्या आईला डॉक्टरांकडून मारहाण

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्ह्यात एका डॉक्टरांकडून रुग्णाच्या आईला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या चूकीच्या उपचारामुळेच त्याचा मृत्यू झालाचा नातेवाईकांचा आरोप आहे. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मुलाचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील गळवा येथील मृतक श्याम ज्ञानेश्वर तिजारे हा काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, आज उपचारादरम्यान, श्यामचे निधन झाले. दरम्यान, मृतक रूग्णांची आई ही डॉक्टरला बोलविण्यासाठी गेली असता दोन डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप अन्नपूर्णा तिजारे ह्यांनी केला आहे. तसेच दोन इंजेक्शन दिल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी म्हटले. या घटनेने शासकीय रुग्णालयात खळबळ उडाली. मृत श्यामच्या आईने मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत मारहाण करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांचे त्वरीत निलंबित करण्याची मागणी केली आहे. श्यामच्या आईसह नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

Protected Content