अपघातात जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेल्या जोशी कॉलनीतील ६७ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात गुरुवार ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विठ्ठल काशिनाथ गोंधळी (वय-६७) रा. मुकुंद नगर, जोशी कॉलनी, जळगाव असे मृत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विठ्ठल गोंधळी हे आपल्या परिवारासह जोशी कॉलनीतील मुकुंद नगरात वास्तव्याला होते. खाजगी कंपनीत सेक्युरिटीचे काम करत होते, तर काही वेळा शेतातील काम देखील करत होते. मंगळवार ४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील शेतातून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीके ६८२) परत येत असतांना अचानक दुचाकीवरून ताबा सुटल्याने ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर बुधवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत कुसुंबा गावचे पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी दिलेले फिर्यादीवरून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे मयतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिश शेख करीत आहे.

Protected Content