आई हे जगातील सर्वोच्च विद्यापीठ – प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

WhatsApp Image 2019 12 24 at 5.17.41 PM

फैजपूर, प्रतिनिधी | आई या शब्दात साक्षात ईश्वराचा आत्मावास करत असून आईसारखे चैतन्य, प्रेम, करूणा, सुसंस्कार जगात कुठेही उपलब्ध होऊ शकत नाहीत. आई प्रेरणा व ऊर्जा यांचा स्रोत असून आपल्या मुलांचीच नव्हे तर समाजाचा उद्धार करण्याची क्षमता आईत असते असे प्रतिपादन परमपूज्य वंदनीय महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

मधुर संस्कार केंद्र, यावल व सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २४ डिसेंबर रोजी श्री गजानन महाराज मंदिर, विरार नगर, यावल येथे हे मातृवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूज्य साने गुरुजींच्या जयंतीचे औचित्य साधून मातृहृदयी स्वर्गीय पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सलग सोळा वर्षे मातृवंदने चा यज्ञ अविरतपणे सुरू आहे. यावेळी समाजातील मातृ प्रेमाचा सन्मान व्हावा व मातृशक्तीचे दर्शन व्हावे यासोबत ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या पाल्यांना उच्चशिक्षित व सुसंस्कारित केले आणि आज जी मुलं समाजसेवा करीत आहेत अशा १० प्रातिनिधिक मातांचा सत्कार सोहळा मातृवंदना या कार्यक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, गादीपती, सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूर तर प्रमुख अतिथी माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापिका प्रा. कमला पाटील, सत्कारार्थी मातेचा प्रतिनिधी म्हणून विद्या सुधाकर सिसोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शशिकला वासुदेव बडे, पाथर्डी, अहमदनगर, केवल ग्यानसिंग पाटील, खडकेसिम, एरंडोल, अलका लक्ष्मण बेंडाळे, सावदा, इंदुमती मंगेश मालखेडे, सुलोचना भीमराव देशमुख, पाळे, नाशिक, रोहिणी रूपचंद पाटील, पुणे, कमल सुरेश चौधरी, मुंबई, आशाबाई सिताराम पारधी, चोपडा, जनाबाई पंढरीनाथ झांबरे, वराडसिम भुसावळ, शाबेरा मेहमूद तडवी, सौखेडासिम, या मातांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. के. बी. पाटील यांनी, सद्यस्थितीत समाज स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक छळ, लिंगभेद अशा समस्येनी ग्रासला असून अशावेळी मातृवंदना सारखा सोहळा समाजाला दिशादर्शक ठरू शकतो असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा कमल पाटील यांनी ‘मी श्यामची आई बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. प्रास्ताविक प्रा. व. पू. होले यांनी केले. त्यांनी स्वर्गीय पी. आर. पाटील यांचा जीवन परिचय करून दिला. सूत्रसंचालन चतुर चौधरी, प्रा. राजेंद्र राजपूत, प्रा. मधुराणी शिंदे यांनी केले. तर आभार बी. एन. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी मधुर संस्कार केंद्र परिवाराने कामकाज पहिले.

Protected Content