यावल येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विपश्यना मार्गदर्शन कार्यशाळा

232

यावल, प्रतिनिधी । येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व समुपदेशन समितीतर्फे विपश्यना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील होते.

डॉ. सुधा खराटे यांनी ‘विपश्यना काळाची गरज’ या विषयावर विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने श्वासाकडे पाहणे. ही एक महत्त्वाची ध्यान पद्धती आहे. त्यामुळे मनातील विकार नाहीसे होतात. मन स्थिर राहते. मानसिक आजार नाहीसे करण्याचे सामर्थ्य विपश्यनेमध्ये आहे. मनाची अस्वस्थता, अस्थिरता, नैराश्य या गोष्टींवर विपश्यना साधनेद्वारे मात करता येते. नियमितपणे अर्धा तास ही साधना केल्याने मन सुदृढ व निकोप राहते. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील म्हणाले की, विपश्यनेमुळे स्मरणशक्ती वाढते. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाढते. प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. सूत्रसंचालन राजू पावरा यांनी केले. आभार प्रा.राजु तडवी यांनी मानले. कार्यशाळेस प्रा. व्ही. बी. पाटील, डाॅ. एस. पी. कापडे, डॉ. अनिल पाटील, प्रा. नजमा तडवी व अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. ए. एस. अहिरराव, डॉ. पी. व्ही. पावरा, सुभाष जाधव, शत्रुघ्न कोळी यांनी कामकाज पहिले.

Protected Content