भाजपातर्फे ८०० पेक्षा अधिक महिलांना ई-श्रमदान कार्ड वाटप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र आणि राज्याच्या कामगारविषयक योजनांचा लाभ केवळ संघटित आणि नोंदीत कामगारांपर्यंत मर्यादित न राहता तो शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन भाजपा कामगार मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी केले. असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा, असेहि ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा आयोजित घरेलू महिला कामगारांची नोंदणी व कार्ड वाटप मेळावा सोमवारी दि. ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. ज्या महिला घरेलू कामगार आहेत अशा ८०० पेक्षा अधिक महिलांना या ठिकाणी ई-श्रमदान कार्ड तयार करून देण्यात आले. या महिलांच्या खात्यात शासनाकडून पैसे जमा केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उमंग महिला मंडळाच्या अध्यक्ष संपदा उन्मेष पाटील, माजी महापौर सीमा सुरेश भोळे, भाजपाच्या जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगला भंडारी, प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधा काबरा, ऍड. भूषण पाटील, प्रदेश सचिव कामगार मोर्चाचे आशिष ढोमणे, कामगार मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य कुमार श्रीरामे, विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील-जाधव, गीतांजली ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष श्याम पुसदकर, महानगर अध्यक्ष सुनिल वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना सुधा काबरा यांनी केली. त्यात कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर मंगला भंडारी, संपदा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून महिला विकासासाठी भाजपा सातत्यपूर्ण कार्यरत असून त्याकरिता विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याचे सांगितले. तर आशिष ढोमणे यांनी, कामगार महिलांचा सन्मान होणे महत्वाची गोष्ट आहे. त्यांना परिवाराचा गाडा ओढण्यासाठी मदत म्हणून भाजपने ई-श्रमदान कार्डच्या माध्यमातून मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी सांगितले की, श्रमाचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशातील माताभगिनी कष्ट करून आपला संसार सन्मानाने पुढे नेत आहेत. त्यांच्यासाठी मोदी सरकारने ई-श्रमदान कार्ड योजना आणली आहे. देशभरात मातृशक्ती वंदन करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले.

Protected Content