रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीन योजनेच्या लाभार्थी अर्जांची मंजुरी प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. शासनाने तालुक्यातील ४३ हजार ४४७ अर्ज ऑनलाइन मंजूर केले आहेत, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू असून, आतापर्यंत ४६ हजार ४२५ महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. महसूल प्रशासनाने रात्रंदिवस काम करून या अर्जांवर पडताळणी केली आहे.
या प्रक्रियेत २ हजार ९४५ अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या असून फक्त २६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तहसीलदार बंडु कापसे यांनी या योजनेच्या संदर्भात कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. महसूल प्रशासनाने ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. यामध्ये तहसीलदार बंडु कापसे, बिडीओ दिपाली कोतवाल, रावेर नगर पालिका मुख्याधिकारी स्वालिया मालगावे, सावदा नगर पालिका मुख्याधिकारी, आणि एकात्मिक बाल विकास अधिकारी शहरी व ग्रामीण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
रावेर तालुक्यातील महिलांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पुढे देखील ऑनलाइन अर्जांची पडताळणी करून मंजूर करण्यात येईल, असे तायडे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असून, यामुळे तालुक्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल.