नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतात एकाच दिवसांत ९० हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. या नवीन बाधितांच्या संख्येमुळे आता भारतात ४१ लाखांहून अधिक बाधित आढळले आहेत. तर, दुसरीकडे मागील २४ तासांमध्ये ७० हजारांहून अधिक बाधितांनी आजारावर मात केली आहे.
देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ इतके बाधित आढळले. तर, एक हजार ६५ जणांचा मृत्यू झाला. भारतात एकूण ४१ लाख १३ हजार ८१२ इतकी बाधितांची संख्या झाली आहे. करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत ७० हजार ६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. आता सर्वाधिक बाधितांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर भारत येण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका आणि ब्राझील हे सर्वाधिक अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे.
जागतिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ६१ लाखांहून अधिक झाली आहे. तर, एक लाख ८६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही अधिक नवीन बाधित आढळत आहेत. येणाऱ्या काही दिवासांत ब्राझीललाही भारत मागे टाकू शकतो. ब्राझीलमध्ये सध्या ४१ लाख २३ हजार बाधित आहेत.
भारतात बाधितांवर यशस्वी उपचार होण्याचे प्रमाण ७७.३२ टक्के आहे. भारतात आतापर्यंत चार कोटी ८८ लाख ३१ हजार १४५ जणांची चाचणी करण्यात आली आहे.