मुंबईत कार्यालये १ नोव्हेंबर व शाळा १ जानेवारीपासून उघडण्याची आशा

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईतील लोकल आणि कार्यालये १ नोव्हेंबरपासून आणि शाळा १ जानेवारीपासून सुरू होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने हा अंदाज व्यक्त केला असून त्यांनी मुंबई महापालिकेला अहवालही सादर केला आहे.

या संस्थेने गणितीय पद्धतीनं शास्त्रीय मॉडल बनवत हा अहवाल पालिकेला सादर केला आहे. जानेवारी २०२१पासून शाळा सुरू करू शकता, असा सल्ला पालिकेला या अहवालातून देण्यात आला आहे. स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अंड कंम्प्युटर सायन्सचे अधिष्ठाता संदीप जुनेजा, प्रल्हाद हर्श आणि रामप्रसाद सप्तर्षी यांनी हा अहवाल तयार केला आहे.

सप्टेंबरमध्ये ३० टक्क्याने मुंबई शहर सुरू केलं जाऊ शकतं. अटी आणि शर्तींवर शहरातील कार्यालये आणि परिवहन सेवा सुरू केल्या जाऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये ही क्षमता ५० टक्क्याने वाढवता येऊ शकते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्णपणे सुरू करता येऊ शकतं, असं डॉ. जुनेजा यांनी सांगितलं. मात्र, सार्वजनिक परिवहन सेवेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. शिवाय मास्क तोंडाला लावलेच पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणी हातांची स्वच्छता राखली गेली पाहिजे. गाड्या आणि कामाच्या ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण केलं गेलं पाहिजे, अशा सूचनाही या अहवालात देण्यात आल्या आहेत.

सप्टेंबरमध्ये करोनाची दुसरी लाट येऊ शकते. मे-जूनमध्ये ज्या पद्धतीने करोनाची रुग्णसंख्या वाढली होती. त्याचप्रमाणे ही संख्या वाढू शकते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत जवळजवळ ७५ टक्के झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये तर अन्य भागातील ५० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतील, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Protected Content