मुंबई प्रतिनिधी । कोरोनाची आपत्ती सुरू असतांनाीं शेतकर्यांना दिलासा मिळावा म्हणून यंदा गत दहा वर्षातील विक्रमी खरेदी करण्यात आल्याची माहिती आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.
या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यात ११,०२९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकर्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच सीसीआय ने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-१९ च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी केली.
कोव्हिड-१९ च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यसामुळे, शेतकर्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-१९ च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकर्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.