
मुंबई (वृत्तसंस्था) गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभांसाठी हजेरी लावत आहेत. अशातच मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. रविवारी सकाळपासूनच ट्विटरवर #मोदी_परत_जा हा मराठी हॅशटॅग ट्रेंड सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सोशल नेटवर्किंगवरून विरोध होत असल्याचे चित्र आज बघावयास मिळाले. अनेकांनी या हॅशटॅगच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी राज्यातील प्रश्न उपस्थित करून ‘मोदी परत जा’ असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलण्यापेक्षा राज्यातील समस्यांवर बोलावे, अशी मागणी या हॅशटॅगच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, याआधीही मोदी तामिळनाडूत ‘गो बॅक मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड चालला होता.