नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच मंदिरात पूजाही आणि आरती केली. मोदी मंदिरात पोहोचताच मंदिरातील पुजाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मोदींकडून रामकुंड येथे जलपूजन आणि गोदावरीची आरतीही करण्यात आली. यावेळी मंदिरात येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत करण्यात आले.
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत.मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिर भगवान श्री राम, माता सीता व बंधू लक्ष्मण यांना समर्पित आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की, 14 वर्षांच्या वनवासात श्रीराम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह पंचवटीत राहिले. यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक असे महत्त्व आहे.
245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
प्रभू श्रीरामांनी पंचवटीत शुर्पनखाचे नाक,कान कापल्यानंतर 14 हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले असता त्यावेळी प्रभू श्रीरामांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सर्व 14 हजार राक्षसांचा वध केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप प्रभू श्रीरामांनी धारण केले होते. कालस्वरूप म्हणून श्री काळाराम नाव प्रसिद्ध झाले, त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले.
नाशिकजवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते. ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत होते. त्याकाळी हे मंदिर लाकडी होते. मात्र ,मूर्ती आज आहेत त्याच होत्या. अनेक श्लोक, करूणाष्टके, आरत्या यांच्या रचना समर्थांनी याच काळारामाच्या पुढ्यात केल्या आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले.
दरम्यान, रामकुंडावरील जलविधी पूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी काळारामचे दर्शन घेतले असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. या ठिकाणी मोदींच्या हस्ते आरतीही झाली.