पाचोरा पालिकेसाठी मोर्चे बांधणी : बिल्दीकर दाम्पत्यही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

पाचोरा, प्रतिनिधी | येथील आगामी पालिका निवडणुकांची चाहूल लागलेली असतांनाच सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक कामाला लागले आहेत. यात शिवसेनेकडून मुकुंद बिल्दीकर व त्यांच्या पत्नी मयुरी बिल्दीकर यांनी अनुक्रमे प्रभाग १ व प्रभाग ८ येथे निवडणूक लढविण्यासाठी मोर्चे बांधणीस प्रारंभ केल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

सत्ताधारी शिवसेनेने आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जनसंपर्क गतिमान केला आहे. त्यातच आमदार किशोर पाटील यांचे जिवलग मित्र, उद्योजक तथा आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर व त्यांच्या सुविद्य पत्नी पाचोरा पिपल्स बँकेच्या संचालिका मयुरी बिल्दीकर हे दांपत्य देखील यंदा निवडणुकीचा फड रंगवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. गत दोन दिवसात त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक आठ मध्ये वाढवलेला जनसंपर्क पाहता मुकुंद बिल्दीकर हे प्रभाग क्रमांक एक मधून तर त्यांच्या पत्नी मयुरी बिल्दीकर या प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

एकाच कुटुंबातून पति पत्नी एकाच वेळी पालिकेच्या दोन वेगवेगळ्या प्रभागातून लढवण्याची ही पाचोऱ्यातील बहुदा पहिलीच वेळ ठरू शकणार असल्याने याची एकच चर्चा रंगली आहे. यंदाची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाची मनाली जात असून सत्ताधारी शिवसेनेचा विजयी वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस व भाजपा पुरस्कृत शहर विकास आघाडीत सामना रंगणार असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे. शासनाने घेतलेल्या नगरसेवकांच्या संख्या वाढीच्या निर्णयाने पालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ चार ने वाढणार असल्याने ३१ जागांसाठी १५ प्रभागाची रचना होईल असा तर्क वर्तविला जात आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गातून एक जागा तर अनुसूचीत जमाती प्रवर्गातून एक जागा वाढण्याची शक्यता आहे.

त्यादृष्टीने विद्यमान नगरसेवकांसह नविन इच्छुकांनी आपल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सुरू केला आहे. यात शुभेच्छा फलक, शुभेच्छा कार्ड, मिठाई, सुकामेवा आदी वाटपाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला ‘सुप्त संदेश’ देत आपले नाव पोहचवण्यासाठी कसरत करतांना दिसून येत आहे.

Protected Content