जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये चढत असतांना एकाचा ६० हजार रूपये किंमतीचा महागडा आयफोन चोरून नेल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली होती. गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात जिल्हापेठ पोलीसांनी संशयित आरोपीला स्वातंत्र्य चौकातून अटक केली. त्याच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजल उर्फ मोगॅम्बो ईब्राहिम तांबोळी वय २३ रा. हिरापूर मालेगाव जि.नाशिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमृतसहर येथे राहणारे विशाल चढ्ढा वय ४६ हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. कामाच्या निमित्ताने शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता जळगाव बसस्थानक आवारात आलेले होते. त्यावेळी त्यांच्या जवळील ६० हजार रूपये किंमतीचा आयफोन हा महागडा मोबाईल चोरून नेला. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सकाळी ११ वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, पो.ना. मुबेर तडवी, पोकॉ अमितकुमार मराठो, पोकॉ रविंद्र मराठे आणि चालक प्रमोद पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी फैजल उर्फ मोगॅम्बो ईब्राहिम तांबोळी वय २३ रा. हिरापूर मालेगाव जि.नाशिक याला शहरातील स्वातंत्र्य चौकातून अटक केली. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे आणि प्रविण जाधव हे करीत आहे.