जळगावकरांच्या उदंड प्रतिसादात ‘जाणता राजा’ महानाट्याची सुरुवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव इथे अचंद्र सुर्य असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आपण पुस्तकात वाचतो पण ‘जाणता राजा ‘ हे महानाट्य पाहताना तो पराक्रम जीवंत होतो. त्यामुळे ‘जाणता राजा’ हे महानाटय अनुभवायलाच हवं, उद्या आणि परवा दोन दिवस जिल्ह्यातील शिवप्रेमीने अनुभवावं असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला पोलीस कवायत मैदान येथे ‘जाणता राजा ‘ या महानाट्याची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरतीने सुरूवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी सोपान कासार यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे सतत संघर्ष करणारे आणि प्रेरणा देणारे असल्याने त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘जाणता राजा’ हे महानाट्य प्रत्येक मराठी माणसाला आणि शिवप्रेमी माणसाला प्रेरणा देत असते.
जळगावमध्ये या आधी देखील ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग झाला होता, त्यावेळी देखील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची आठवण पालकमंत्र्यांनी यावेळी करून दिली. हा सुंदर उपक्रम सुरू केल्याने मुख्यंमत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. जळगाव शहरात आयोजन करण्यात आलेल्या या महानाट्याचा लाभ जळगावकरांनी घ्यावा,असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

‘जाणता राजा’ महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित महाआरतीला उपस्थित शिवप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून उदंड प्रतिसाद दिला. यावेळी पोलीस कवायत मैदानावरील हे विलोभनीय दृश्याने आसमंत उजळून निघाले होते.

18, 19 आणि 20 असे तीन दिवस जाणता राजा हे महानाट्य जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. जिवंत देखावे व प्रचंड मोठा सेट असलेले हे महानाट्य म्हणजे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि इतिहास मांडणारे आहे हे महानाट्य विनामूल्य असून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आले आहे. जळगावकर नागरिकांचाही उदंड प्रतिसाद या महानाट्यासाठी पहायला मिळतोय. सोमवार आणि मंगळवारी देखील हे महानाट्य सादर होणार असून जळगावकरांनी ते पाहायला यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content