जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकात प्रवाशाच्या खिश्यातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज कुमार राम (वय-१९) रा. मयाटोला ता. महाराजपूर (झारखंड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल ठाकुरदास चौधरी (वय-५३) रा. वृंदावन कॉम्प्लेक्स, राजू नगर, डोंबिवली, वेस्ट कल्याण हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते रेल्वेमध्ये नोकरीला आहेत. २१ जून रोजी त्यांच्या खासगी कामासाठी ते भुसावळ येण्यासाठी जळगाव येथे शालक सुनील गोविंदा ढाके रा. कोल्हे नगर, जळगाव यांच्याकडे ते मुक्कामाला होते. दरम्यान बुधवार २२ जून रोजी भुसावळ येथे जाण्यासाठी अनिल चौधरी सकाळी ९ वाजता जळगाव नवीन बसस्थानकात आले. भुसावळ बसमध्ये गर्दीतून चढत असताना त्यांच्यामागे अनोळखी व्यक्तीने त्यांना धक्का मारला आणि त्याच्या शर्टाच्या खिशातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरी करून चोरून नेऊन पळून गेला. त्यावेळी अनिल चौधरी यांनी आरडाओरड केली असता मोबाईल हिसकावणारा चोरटा पसार झाला होता. सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे शोध पथकाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमित मराठे यांनी गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपी सुरज कुमार राम (वय-१९) रा. मयाटोला ता. महाराजपूर (झारखंड)याला नवीन बसस्थानक आवारातून अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरीचे ८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांचया सोबत असलेल्या साथीदारांचा देखील शोध घेण्याचे काम सुरू आहेत.